औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शहरी भागात अनेक ठिकाणी मदतीचे हात पुढे येत आहेत. मात्र ग्रामीण भागात मदत देताना अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करत मावळा प्रतिष्ठानने ग्रामीण भागातील गरजूंना धान्य आणि जेवणाचे डबे पोहचवण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे.
गंगापूर तालुक्यात मावळा प्रतिष्ठानने आपल्या मित्र मंडळींना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत उभी करण्याबाबत आवाहन केले होते. त्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि रोज किमान 500 लोकांना मदत होऊ शकेल, इतके मदतीचे हात पुढे आले आहेत. फूड ऑन कॉलच्या माध्यमातून दिवसभरात जवळपास 1500 लोकांना जेवणाचे डबे दिले जात असल्याची माहिती अनिल पोळ यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांचे खूप हात होत आहे. हाताला काम नसल्याने पैसे नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात अशा लोकांपर्यंत पोहचणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यात मावळा प्रतिष्ठाच्या वतीने फूड ऑन कॉल संकल्पना सुरू केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांना मदतीचे आवाहन करण्यात आले. सुरुवातीला 500 लोकांना भोजन मिळेल इतकी मदत मिळाली. काम सुरू झाले. मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वयंसेवकांची तीन भागात विभागणी करण्यात आली. साहित्य आणणारे, तयार करणारे आणि वितरित करणारे अशी कामाची विभागणी करण्यात आली. मागील दहा दिवसांत 1500 लोकांपर्यंत भोजन पोहचवन्यात यश मिळाले. ज्या ठिकाणी दररोज जाणे शक्य नाही, त्या ठिकाणी किराणा सामान पोहचवण्याचे काम केल्याने अनेकांना मदत मिळाली. लॉकडाऊन असेपर्यंत अशीच मदत उभी करणार असल्याचे मावळा प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले.