औरंगाबाद - फेसबुक प्रसार माध्यमातून एक आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखवल्यााप्रकरणी जमाते उलमा हिंदच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख बारहाते, राजेंद्र बाळासाहेब पवार, मनोज श्रीमंत मोहिते, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरख बाराहाते यांने फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यामध्ये 14 एप्रिलनंतर लॉक डाऊन वाढविल्या गेले यास फक्त तबलिगी जमात जबाबदार आहे, अशा प्रकारचा मजकूर होता.
सध्या कोरोनाविषाणू संदर्भात जातीवादी तेढ निर्माण होईल, असे कोणतेही वक्तव्य फेसबुक प्रसार माध्यमातद्वारे प्रसारित करण्यावर सरकारने बंदी घातलेली आहे. असे असतानाही फेसबुकवरील गोरख बाराहाते, राजेंद्र पवार, मनोज मोहिते या फेसबुक अकाउंटधारक व्यक्तींनी फेसबुक व प्रसार माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट टाकून शासनाच्या नियमांचा भंग केला.
या प्रकरणी जमाते उलमा हिंदचे अध्यक्ष यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र बाळासाहेब पवार, मनोज श्रीमंतराव मोहिते, गोरख बाराहाते या तिघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे करत आहे.