औरंगाबाद - 'आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. अनेक पिढ्यांनी हाच व्यवसाय करून उपजीविका भागवली. या व्यवसायावर आजवर आमचं समदं सुरळीत सुरू होतं. मात्र दिड वर्षापूर्वी कोरोना आजाराने शिरकाव केला आणि आमच्या व्यवसायावर जणूकाही डोंगर कोसळला, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ग्राहकांना इस्त्री करण्यासाठी कपडे आणा म्हटलं तर ते म्हणतात कुठं बाहेर जायचं कामच नाही. तर इस्त्रीचे कपडे घालायचे कसे? असा उलट सवाल ग्राहकच आम्हाला करत आहेत. मायबाप सरकारने सांगावं आता आम्ही जगावं कसं?', असा सवाल आहे गेल्या तीन पिढ्यांपासून इस्त्री व्यवसाय करणाऱ्या साईनाथ हजारे यांचा.
निर्बंधांमुळे कार्यालये बंद, व्यवसाय ठप्प -
गेल्या दिड वर्षापूर्वी देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. या आजारामुळे नागरिकांच्या जीवनात निर्बंध आले. यामुळे हातावर पोट आलेल्या नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला. आज अनेक पारंपरिक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. यामुळे कित्येक पिढ्यांपासून पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याने नोकरदारांना घरूनच काम करावं लागत आहे. त्यामुळे या नोकरदारांना कार्यालयात घालण्यासाठी कडक इस्त्रीचे कपडे देणाऱ्या हाताचे काम थांबले आहे.
'मायबाप सरकारने इतरांना मदत केली, मात्र आमच्या व्यवसायिकांचे काय?'
'कोराना आजारामुळे अनेक कामगारांना अडचणी येत आहेत. या अडचणीतून सावरण्यासाठी सरकार रिक्षाचालक व काही कामगारांना आर्थिक मदत करत आहे. सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीची या कामगारांना काहीअंशी मदत मिळाली. मात्र, आमच्या या पारंपरिक व्यवसायाला राज्य सरकारने आजपर्यंत कुठलीही मदत केलेली नाही. मायबाप सरकारने आम्हाला आर्थिक मदत द्यावी. तसेच लाईट बिलात आम्हाला सवलत द्यावी. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून द्यावा', अशा मागण्या लाँड्री व्यवसायिक करत आहेत.
हेही वाचा - खरंय! टिकटॉक पुन्हा सुरू होणार? बाईटडान्सचा #TickTock नावाने नवा अर्ज