औरंगाबाद - पूर्वीच्या ठेकेदाराने पाल येथील गिरीजा नदीच्या बंधारा वजा पुलाचे बांधकाम अपूर्ण ठेवल्यामुळे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवत करारनाम्यानुसार काम पुर्णत्वास आणल्यानंतर मुंबईतील कंपनी मालकाने पैसे न देता अपहार केल्याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत दिनकर भाके (रा. ऑफीस द ग्रेट ईस्टर्न गॅलरिया प्लॉट क्र. २०, सेक्टर क्र. ४, नेरुळ, नवी मुंबई) असे फसवणूक केलेल्या कंपनी मालकाचे नाव आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबईतील नमस्तुते इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचा मालक रणजीत भाके याने फुलंब्री तालुक्यातील पाल येथे असलेल्या गिरीजा नदीच्या नवीन बंधारा वजा पुलाचे काम निवीदा आधारे २८ ऑगस्ट २००९ ला घेतले होते. त्यानंतर ठेकेदार भाऊसाहेब आबाराव हिवाळे (७७, रा. फ्लॅट क्र. २, गौरव अपार्टमेंट, गोळेगावकर कॉलनी, रेल्वे स्टेशन रोड) यांची नमस्तेतू कंपनीचा मॅनेजर अटाळकर याच्याशी ओळख झाली. पूर्वीचे कंत्राटदार सचिन सुवर्णा यांनी पुलाच्या काम सोडलेले आहे. ते तुम्ही पूर्ण करता का ? असे विचारले. त्यावरुन हिवाळे यांनी काम पूर्ण करण्यासाठी होकार दिला. पुढे गिरीजा नदीचे अपुर्ण राहिलेले काम हिवाळे यांनी कामाचा करारनामा भाकेसोबत रेल्वे स्टेशन येथील माया हॉटेलमध्ये २४ डिसेंबर २०१२ रोजी केला. त्यात गिरीजा नदीवरील बंधारा वजा पुलाच्या कामासंबंधी अटी व शर्थी देखील होत्या. त्यानंतर या पुलाचे बांधकाम मे २०१४ मध्ये पूर्ण झाले.
हिवाळे यांनी पुलाचे काम केल्यानंतर त्याचे बील नमस्तेतू कपंनीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केले. हे बील तपासल्यानंतर बांधकाम विभागाने नमस्तेतू कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. मे २०१४ पर्यंत काम केल्याचे पैसे हिवाळे यांना देण्यात आले. मात्र, कामाच्या बिलातून बांधकाम विभागाने दोन टक्के सेक्युरिटी म्हणून सहा लाख ३८ हजार रुपये व तीन टक्के मेन्टेंन्स चार्जेस म्हणून घेतलेले नऊ लाख सात हजार ५२८ रुपये असे एकूण १५ लाख ४५ हजार ५२८ रुपये पाच वर्षासाठी राखून ठेवले होते. हे पैसे हिवाळे यांनी केलेल्या कामाच्या बिलातील होते. ते १५ लाख ४५ हजार ५२८ रुपये बांधकाम विभागाने २५ जून २०१९ रोजी आरटीजीएसव्दारे नमस्तेतू कंपनीला पाठवले. तर कंपनीने काम दिल्याच्या मोबदल्यात ११ मे २०१३ रोजी हिवाळे यांच्याकडून साडेसहा लाख रुपये डिपॉझिट म्हणून कपात केले होते.
तर दुसरीकडे सचिन सुवर्णा यांच्या कामाच्यावेळी बांधकाम विभागाने नमस्तेतू कंपनीचे तीन लाख १६ हजार ३३ रुपये मेन्टेंन्स चार्जेस म्हणून कपात केली नव्हती. पण ती कपात नमस्तेतू कंपनीने १० ऑक्टोबर २०१३ रोजी तीन लाख १६ हजार ३३ रुपयांच्या स्वरुपात केली. त्यामुळे हिवाळे यांचे २५ लाख ११ हजार ५५१ रुपये नमस्तेतू कंपनीकडून येणे बाकी होते. या पैशाची मागणी करण्यासाठी बऱ्याचदा हिवाळे यांनी रणजीत भाकेशी संपर्क साधला. त्यानंतर भाकेने त्यांना वीस लाख ८५ हजार ११६ रुपय देण्याचे कबुल केले. त्याबाबत ११ फेब्रुवारी २०२० रोजी करारनामा करण्यात आला. त्यानुसार फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी सात लाख रुपये तर उर्वरीत सहा लाख ८५ हजार ११६ रुपये देण्याचे भाकेने सांगितले होते. त्यामुळे आणखी भाकेकडे १९ लाख ८५ हजार ११६ लाख रुपये शिल्लक आहेत. तो पैसे देत नसल्याचे पाहून अखेर रविवारी हिवाळे यांनी वेदांतनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार उत्तम जाधव करत आहेत.