औरंगाबाद - विद्यापीठात झालेल्या जळीत प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांनी बदनामी थांबवा अशी मागणी केली आहे. मुलाचे एकतर्फी प्रेम असून त्याबाबत वारंवार तक्रार दिली आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आहे. तरी प्रसार माध्यमे प्रेयसी असा उल्लेख करत आहेत. मुलीने त्याला फसवल अस सांगत असल्याने आम्हाला त्रास होतो. सविस्तर माहिती वेगळी असल्याचा दावा मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. इतकंच नाही तर गजाननच्या काकू सोबत झालेले संभाषण रेकॉर्डिंग ( Pooja Salve Call Recording ) त्यांनी माध्यमांना दिली. ज्यात गजाननला समजून सांगा अस ती सांगत होती.
वारंवार दिली होती तक्रार - गजानन तसेच पूजा दोघेही विद्यापीठात संशोधन करत होते. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी त्यांचं एकमेकांसोबत बोलणं होत. मात्र गजानन हा सतत पूजाच्या मागे लागून तिला त्रास देत होता. माझ्याशी लग्न कर असा तगादा त्याने लावला होता. इतकच नाही तर याआधी त्याने अंगावर पेट्रोल टाकून घेणे, हातावर ब्लेड मारणे असे प्रकार केले होते. त्यामुळे एकदा सिडको पोलिसात तर एकदा बेगमपुरा पोलिसात मुलीने तक्रार अर्ज दिला होता. मात्र, त्रास थांबत नसल्याने अखेर पूजाने 17 नोव्हेंबर रोजी बेगमपुरा पोलीसात तक्रार देऊन आपली व्यथा मांडली होती अशी, माहिती पूजाच्या कुटुंबीयांनी दिली.
गजानन त्रास देत असल्याचे पुरावा - शिक्षण घेत असताना मुलं मुली मित्र होतात. त्यात काही गैर नाही. मात्र त्याचा फायदा घेऊन गजानन सतत त्रास देत होता. आपल्या मित्रांना ही माझी प्रेयसी आहे असं सांगत होता. त्यावर न थांबता काही ठिकाणी आमचं लग्न झालंय असंही तो सांगत होता. मात्र प्रत्यक्षात असं काहीच घडलं नसून गजानन देत असलेल्या त्रासाबाबत सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. त्याने वारंवार केलेले फोन, व्हाट्सअप मेसेज आमच्याकडे आहेत. त्याच्यासोबत होत असलेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग देखील जपून ठेवलेल आहे. पूजाच्या मोबाईल सर्व पुरावेमध्ये असून सध्या मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. ते जर समोर आलं तर निश्चित खरा प्रकार सगळ्यांसमोर येईल असा दावा पूजेच्या कुटुंबियांनी केला आहे. गजाननकडे जर पूजाने फसवलेले पुरावे असते किंवा लग्न केलं असतं तर, त्यानेही पुरावे पोलिसात जाऊन तक्रार करायला हवी होती. मात्र अशा पद्धतीने टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही. आज त्याच्या निधनामुळे आम्हालाही दुःख आहे. त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, याची जाण आम्हाला आहे अस, देखील पूजाच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
गजानन मुंडे (Gajanan Munde) आणि पूजा साळवे (Pooja Salve) यांच्या प्रकरणात काही गोष्टी आता समोर यायला सुरुवात झाली आहे. पूजाने पोलिसात दिलेल्या तक्रारीची एक प्रत विद्यापीठाला पोस्टाने पाठवली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर एका प्राध्यापकाने घटनेच्या दिवशी सकाळी गजाननला बोलून तुझी पीएचडीची नोंदणी रद्द होणार आहे. त्यामुळे तू तुझा मार्ग शोध असे सांगितले होते. त्यामुळे आपण आता संपलो असे त्याला वाटल्याने सुसाईट नोट लिहून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पोलिस तपासात उघड - विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात संशोधन करणारा गजानन मुंडे यांनी स्वतः जाणून घेत पूजा साळवे हिला कवटाळले. यामध्ये गजाननचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना करून, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे तपास दिला आहे. तपास पथकाने पीडित तरुणीकडील पेन ड्राईव्ह, व्हाट्सअप चाट जप्त केले आहे. शिवाय विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, पीएचडीचे मार्गदर्शक, इतर प्राध्यापक, तरुण - तरुणी, मित्र मैत्रीण यांचे जबाब नोंदवले आहे.
लिहिली सुसाईड नोट - घटनेच्या सकाळी गजाननने आपल्या खोलीवर जाऊन सुसाईट नोट (Suicide Note) लिहिली होती. त्यामध्ये त्याने आई वडिलांची माफी मागितली होती. या जन्मी नाही मात्र पुढच्या जन्मी तुमचे रून फेडेल असे त्याने पत्रात लिहिले होते. इतकेच नाही तर पूजाने आपली फसवणूक केली असून आत्तापर्यंत मी तिच्यावर अडीच लाख रुपये खर्च केल्याचा देखील त्याने नमूद केले होते. त्यामुळे या प्रकरणात वेगवेगळे खुलासे रोज होत आहेत. त्याप्रमाणे पोलीस आपला तपास करत आहेत.
केली होती तक्रार - समोर आलेल्या माहितीनुसार मृत गजानन मुंडे यांनी पीडित तरुणीने फसवण्याची तक्रार केली होती. त्यावर एका प्राध्यापकाने दोघांना समोरासमोर बसवून दोघांचे समुपदेशन केले होते. त्यावर गजानन ने एकदा तिने सॉरी म्हणावे अशी अट घातली होती. मात्र पूजाने ती मान्य केली नाही. याशिवाय दोघांमधील व्हाट्सअप मेसेज गजानन संबंधित प्राध्यापकांना दाखवले होते. अशी माहिती समोर आली आहे.