औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात सकाळी शेतात गेल्यानंतर झालेले नुकसान पाहून कृष्णा एकनाथ काकडे (वय 38) या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
कृष्णा काकडे सकाळी नेहमी प्रमाणे दूध काढण्यासाठी शेतात गेले. 2 दिवसांपूर्वी या गावात 100 मी.मी. पाऊस झाला होता. त्यामुळे सगळे पीक वाया गेल्याचे त्यांनी बघितले. शेतातील हे विदारक चित्र पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कृष्णा काकडे यांच्यावर धानोरा गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - आमचे सरकार आल्यावर सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे
कृष्णा काकडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन मुले असा परिवार आहे. खरिपातील पिकाच्या पैशातून त्यांनी मुलीचे लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. यामुळे काकडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.