औरंगाबाद - नवे सरकार आले तरी राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे. औरंगाबाद औरंगपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, गोकुल दलसिंग चुंगडे असे शेतकऱ्यांचे नाव आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली असल्याचे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी सांगितले आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने शेतात शेततळे घेतले होते. मात्र, शेततळ्याचे मिळणारे अनुदान मिळाले नसल्याने ते त्रस्त होते. त्यातच मुलीचे लग्न असल्याने पैसे आणावे कोठून? असा प्रश्न त्यांना सतावत होता. यातूनच शेतकऱयाने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत.
लाडसावंगीच्या औरंगपूर येथील गोकुल दलसिंग चुंगडे (वय-५०) याने राहत्या घरात गुरुवारी सायकांळी गळपास घेऊन आत्महत्या केली. गोकुळ चुंगडे राहत्या घरी सायकांळच्या वेळी आले. त्यानंतर खोलीचा दरवाजा बंद केला. कुटुंबीयांनी आवाज देऊनही प्रतिसाद देत नसल्याने ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, चुंगडे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. गावकऱ्यांनी त्यांना लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला आहे. चुंगडे यांना शेतात बनवलेले शेततळे व त्यात टाकलेल्या पन्नीचे (ताडपत्री) बिल मिळाले नव्हते. तसेच २६ एप्रिल रोजी मुलीचे लग्न जवळ आल्याने ताण अनावर होवून त्यांनी आत्महत्या केल्याचे गावकऱ्याने सांगितले. चुंगडे यांच्यावर सोसायटी, बँकेचे व बचत गटाचे कर्ज असल्याची सातबाऱ्यावर नोंद आहे. या विषयी करमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
हेही वाचा - शेतात राखणदारी करणाऱ्या शेतकऱ्याचा खून, मचाणीवर आढळला जळालेला मृतदेह
हेही वाचा - शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरुच... अतिवृष्टीने घेतला आणखी एका शेतकऱ्याचा बळी