औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला 101 रुपयांची अनोखी मनिऑर्डर मिळाली. ही भेट दिली आहे एका गरीब कुटुंबाने. कर्करोगाने आजारी असलेल्या भाच्याला मुख्यमंत्र्यांच्या मदतीने जीवनदान मिळाले. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलाच्या आत्याने मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला सहाय्यता निधीसाठी ही मनिऑर्डर पाठवली.
रेणुका गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी देखील भावूक होत पत्र स्वतः ट्विटर वर टाकत आभार व्यक्त केले. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथील ५ वर्षांचा वेदांत भागवत पवार हा चिमुकला कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होता. वेदांतचे वडील मोलमजुरी करणारे त्यामुळे घराची परिस्थिती बेताची असल्याने उपचार करणे शक्य नसल्याने कुटुंबीय हतबल झाले. त्यावेळी नेवासा येथे राहणाऱ्या वेदांतच्या आत्या रेणुका गोंधळी यांनी मुख्यमंत्र्यांना संपर्क साधत मदत मागितली. मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिसाद देत मदत पुरवली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख 90 हजारांची मदत वेदांतला मिळाली. मुंबईच्या एसआरसीसी बाल रुग्णालयात वेदांतवर उपचार झाले आणि त्याला जीवनदान मिळाले. मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाला खर्चाची उधळपट्टी न करता मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करा असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला. त्यात सर्वात भावनिक मदत ठरली ती वेदांतची आत्या रेणुका गोंधळी यांची. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे राहणाऱ्या रेणुका यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत 101 रुपयांची मदत केली आहे. माझ्या भाच्याला मदत मिळली आणि त्याचे प्राण वाचले, अशी मदत सर्वांना व्हावी यासाठी आपण मदत करत असल्याची भावना रेणुका यांनी व्यक्त केली.