औरंगाबाद - शहरातील बायजीपुरा भागात ईडीने 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' या संघटनेच्या कार्यालयावर छापा मारला. या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कार्यालयाची झाडाझडती घेत संघटनेच्या दोन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी केली.
दिल्लीच्या दंगलीत केलेल्या मदतीची चौकशी -
दिल्ली दंगलीशी संबंधित काही घटकांना 'पॉप्युलर फ्रंट' या संघटनेने मदत केली होती. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली होती, अशी माहिती समोर आली. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने छापा टाकल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात काही ईडीने काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तर, एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. आज सकाळी छापेमारीकरून ईडीचे पथक माघारी गेले आहे.
आम्ही चांगले काम करतो - पॉप्युलर फ्रंट
आम्ही समाजाशी संबंधित चांगली कामे करतो. याला अटकाव करण्यासाठी सरकारकडून अशा पद्धतीची छापेमारी सुरू आहे, असा आरोप पॉप्युलर फ्रंटने केला आहे. काहीही झाले तरी आम्ही आमचे चांगले काम थांबवणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. ईडीने मारलेल्या छाप्याच्या विरोधात पॉप्युलर फ्रंटच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
काय आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ?
'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'(पीएफआय) ही कट्टरवादी संघटना समजली जाते. या संघटनेचे काम सिमी संघटनेसारखे असल्याचा संशय गुप्तचर संघटनांना आहे. देशविरोधी कारवायांमध्ये या संघटनेच्या माध्यमातून पैसे पुरवले जातात, असाही संशय आहे. हाथरस येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मथुरा येथून पकडण्यात आलेल्या पीएफआयच्या सक्रिय सदस्यांच्या चौकशीनंतर आता त्यांच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू झाली आहे. देशात अनेक ठिकाणी छापे टाकल्याचे समोर आले आहे.
'या' ठिकाणीही झाली छापेमारी -
ईडीने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील 22 कार्यालयांवर छापेमारी केली. यामध्ये केरळ - 6, तामिळनाडू - 5, कर्नाटक - 3, दिल्ली - 2, बिहार - 2, महाराष्ट्र - 1, राजस्थान - 1, यूपी - 2 येथील कार्यालयांचा समावेश आहे.