औरंगाबाद - सोशल मीडिया आणि यांत्रिकीकरणामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल होत आहे. माणसांची मानसिकता नकारात्मक होत चालल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समाजात अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.
राज्यात गेल्या ८ दिवसात महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, मुलीवर अॅसिड हल्ला, लहान मुलींना अश्लील चित्रफीत दाखवण्याचा प्रकार अशा घटना घडल्या. या घटना समाजात पुरुषांमध्ये असलेली विकृती दर्शवीतात. त्यामध्ये वैयक्तिक रोष, एखाद्याने दिलेला नकार न पचवता येणे अशी मानसिकता दिसून येत असल्याच मत मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केले.
राज्यात घडत असलेल्या घटना दुर्दैवी आणि चुकीच्या असल्याचे मानसोपचार तज्ञांनी म्हटले आहे.एखादा व्यक्ती हिंसा करताना वैयक्तिक, सामाजिक किंवा कौटुंबीक कारणांनी हिंसा करतो. वैयक्तिक गुन्हा समाज विघातक असून, व्यसनामुळे मेंदूवरचे त्याचे नियंत्रण हरवलेलं असते. त्यामुळे तो गुन्ह्याकडे वळतो. त्याचबरोबर कौटुंबिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर व्यक्ती विकृतीकडे वळतो. समाजात आजूबाजूला घडत असलेल्या सामाजिक परिस्थितीमुळेही व्यक्तीची मानसिकता बदलत असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप देशमुख यांनी व्यक्त केले.
आज काल सर्वकाही यांत्रिकीकरणामुळे बदलत चालले असून, यश आणि अपयश व्यक्तीला पचत नाही. कोणी आपल्याला नाही म्हणत असेल तर ते सहन होत नाही. त्याची सहनशीलता संपत चालली असल्याने अशा विकृती वाढत आहेत. आपल्यामुळे कोणाला काय त्रास होईल, काय नुकसान होईल याबाबत काहीही विचार व्यक्ती करत नसल्याने अशा घटना घडत असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शीसोदे यांनी व्यक्त केले.