नाशिक - जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गोदाकाठच्या अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. वैजापूर तालुक्यातील सरला बेट, महालगाव परिसराला पाण्याने वेढा घातला आहे. जिल्हा प्रशासनाने पुराचा धोका लक्षात घेता गोदाकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
नाशिक भागात मोठा पाऊस सुरू असल्याने, गोदावरी नदीला पूर आला आहे. प्रचंड वेगाने पाणी जायकवाडी धरणाकडे झेप घेत आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रात असलेल्या औरंगाबादच्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील काही गावांना पुराचा धोका आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता, सोमवारी गोदावरी नदी काठच्या गावातील शाळांना सुट्टी देण्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
तर, वैजापूर तालुक्यातील वांजरगाव, बाजाठाण, हमरापूर, अव्वलगाव, पुरणगाव येथील नदीकाठच्या व सखल भागात वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बाभूळगाव गंगा, नागमठाण व नांदूरढोक येथील वस्त्यांवरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नाशिक धरण समूहातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे.