छत्रपती संभाजीनगर ( गंगापूर): दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या 22 वर्षीय तरुणाचा अखेर मृतदेह पोलीसांना सापडला आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलीस संबंधित परिसरात त्याचा शोध घेत होते. आशुतोष भास्कर पाथ्रीकर (वय 22 वर्षे रा बजाजनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांना गोदावरी नदीच्या पाण्यात मृतदेह तरंगत असताना दिसून आला. तीन दिवस पाण्यात तरुणाचा असल्यामुळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. तर घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाखरे,पोलीस मित्र सतीश मिसाळ घटनास्थळी दाखल झाले होते.
२३ मार्चपासून होता बेपत्ता: आशुतोष हा ताण तणावात असल्याने २३ मार्च रात्री नऊ वाजेपासून घरातून कुणाला काहीही न सांगता दुचाकी घेऊन घरातून निघून गेला होता. कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर दुचाकी लावून त्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह शोधण्यासाठी तीन दिवसांपासून शोधमोहीम सुरु होती. रविवारी सकाळी गोदावरी नदीच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळुन आला आहे. तर जीवनरक्षक दलाचे बाळू चित्ते, अजय जगधने सुभाष निकम, विजय वाघ, मल्हार सोनवणे,अनंता कुमावत यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद: तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या आशुतोषचा मृतदेह गोदावरी नदीच्या पाण्यात तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती गंगापूर पोलीसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जिवनरक्षक दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून रुग्णवाहिका चालक अनंता कुमावत यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियाच्या ताब्यात देण्यात आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, ही आत्महत्या आहे की घातपात याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाखरे करत आहे.
हेही वाचा: Crime News घटस्फोटाच्या तारखेसाठी आलेल्या पत्नी आणि सासऱ्याच्या अंगावर घातली कार