औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली. त्यानंतर बाजारपेठांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.
पॉझिटिव्हीटी दर घसरल्याने नागरिक बिनधास्त -
दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हीटी दर 22 ते 23 टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. लग्न सोहळे बंद करत व्यवसाय करण्यावर निर्बंध लावले. विकेंड लॉकडाऊन असे प्रयोग राबवले, त्यानंतर राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लावले. त्यामुळे औरंगाबादच्या पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्त वावर करत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्य बाजारपेठ झाल्या हाऊस फुल -
एक जूनपासून अनलॉक झाल्यानंतर औरंगाबादच्या मुख्य बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज या मुख्य बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीदेखील होत आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव पुनः होण्याची वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना अद्याप संपलेला नाही, कोविडचे नियम पाळा असे आवाहन महानगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
अशी आहे रुग्ण संख्या -
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 131745 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143260 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3236 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2879 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
हेही वाचा - नागपुरात बंदूक घेऊन वैद्य कुटुंबाच्या घरात शिरला गुंड, ५० लाखांची मागितली खंडणी