औरंगाबाद : या घटनेत शाहरुख अन्वर शेखला भोसकणारा हैदर खान उर्फ शारेख जाफर खान (रा. संजय नगर, गल्ली क्र. ११) हा आरोपी देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार शाहरुख आणि त्याचा मित्र हैदर हे दोघेही रात्री बायजीपुरा येथील सिकंदर हॉल समोर बसलेले होते. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला.
हैदरने त्याजवळील धारदार चाकू काढून शाहरुखच्या कमरेवर, पायावर, बरगडित, सपासप वार केले. वार वर्मी लागल्याने शाहरुख रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. ते पाहून मारेकरी हैदर तेथून पसार झाला. शाहरुख रक्ताच्या थारोळ्यात मदतीची याचना करीत होता. मात्र, त्याच्या मदतीला कोणीही आले नाही. या भांडणात आरोपी हैदर खान देखील जखमी झाला. त्याच्यावर पोलिसांच्या देखरेखीत घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
मृत शाहरुख व भोसाकणारा हैदर दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांची टोळी असून दोघांवर चोरी, हाणामारी सारखे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दोघेही नशे खोर आहेत. ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी दोघेही नशेच्या गुंगीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. यात जुनेद नावाचा आणखी एकजण जखमी झाला आहे.