औरंगाबाद - शहरात कोरोनामुळे कडक लॉकडाऊन असताना, वाळूज येथील वडगाव कोल्हाटी भागात कुख्यात गुन्हेगार बाळू वामन पाटोळे (वय 32, रा. वडगाव कोल्हाटी) याचा शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दगडाने ठेचून खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून खून झाला असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. खून करणारे संशयित आरोपी हे देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू होती.
प्रशासनाची पकड ढिली झाल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे प्रशासनाने निर्णय घेत वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. 4 ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन असताना तसेच शहरात 10 ते 18 जुलैपर्यंत लॉकडाऊन असताना पहिल्याच दिवशी एका कुख्यात गुन्हेगाराचा खून झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.
दरम्यान, बाळू पाटोळे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र बाळगणे, दुखापत करून अतिक्रमण करणे, धाक दाखवणे, जबरी चोरी करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई, २००१ मध्ये हद्दपारी, २००४ मध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा - औरंगाबाद शहरात नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
हेही वाचा - औरंगाबादेत रेकॉर्डवरील तडीपार आरोपीला अटक, जिन्सी पोलिसांची कामगिरी