औरंगाबाद - कोरोनाच्या या महासंकटात त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी न्यायालयाने आता खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यात अनलॉक - 1 सुरू झाला आहे. मात्र, न्यायालयीन कामकाज आता ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे. न्यायाधीशासमोर दोन्ही पक्षकारांचे वकील व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपली बाजू मांडत आहेत. अशापद्धतीने आवश्यक प्रकरणाचा न्यायनिवडा ऑनलाईन पद्धतीने केला जात आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचे महासंकट आल्यानंतर न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे हित पाहून काही निर्णय घेण्यात आले. यात अत्यावश्यक प्रकरण वगळता सर्व प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. तर राज्यातील सर्वच न्यायालय ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित होती.
कोरोनामुळे देशातील बहुतांश संस्थांचे कामकाज ठप्प झाले. त्यात न्यायालयात चालणारे खटले देखील थांबले होते. मात्र, अत्यावश्यक खटल्याची सुनावणी घेण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कामकाजाची पद्धतही बदलली आहे. कोरोनाचे संकट पाहता न्यायालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खटले चालवले जात आहेत.
औरंगाबाद खंडपीठात रोज किमान 50 ते 60 प्रकरण ऑनलाईन पद्धतीने सुनावणीसाठी घेतली जात आहेत. न्यायमूर्ती झूम अॅप्लिकेशनच्या माध्यमातून संबंधित खटल्याच्या वकिलांशी ऑनलाईन संवाद साधत आहेत. दोन्ही बाजूने वकील एकाच वेळी आपापली बाजू मांडतात. त्यानुसार प्रकरणातील तपशील न्यायमूर्ती जाणून घेत आहेत. कोरोनामुळे थांबलेले न्यायचक्र आता वेगळी पद्धतीने पुन्हा कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे निश्चितच कोरोनाच्या या काळात अनेकांना वेळेत न्याय मिळेल, असा असा विश्वास औरंगाबाद खंडपीठातील वकिलांनी केला आहे.