गंगापूर(औरंगाबाद) - कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हलाखीची परिस्थिती असल्याने महिलेला रिक्षा टेम्पोमध्ये विलगीकरण करून उपचार घेण्याची वेळ आली आहे. ही घटना गंगापूर शहरात घडली आहे. 35 वर्षीय महिला अनिता शामराव पवार यांनी रिक्षा टेम्पोमध्ये विलगीकरण करून घेतले आहे. घशात खवखव व अंगदुखी असल्याने त्यांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर टेस्ट केली. 15 मे रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
हेही वाचा - अंगावर येणारा समुद्र, लाटांच्या उंच भिंती... तौक्तेचे भयाण रुप व्हिडिओत कैद, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्ये
- राहायला झोपडी असल्याने विलगीकरणास जागा नाही
डॉक्टरांनी त्यांना कोरोना सेंटरमध्ये विलगीकरण होण्यास सांगितले होते. मात्र, अनिता यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला. पण छोटीसी झोपडी आणि घरात लहान मुलगा असल्याने त्यांनाही आपल्यामुळे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून भावाच्या रिक्षा टेम्पोमध्ये विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला. नातेवाईक एका लांब बांबूच्या मदतीने त्यांना जेवण देत आहेत. रोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्यांना कोरोना झालं तर दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होणे कठीण आहे. या घटनेने कोरोनाची दाहकता व भीषण वास्तव पुढे आले आहे.
- रिक्षा टेम्पोतच महिला विलगीकरण
गंगापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राहणाऱ्या अनिता पवार यांनी आपल्या भावाच्या रिक्षा टेम्पोमध्ये विलगीकरण होऊन कोरोनवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. अकरा दिवसांपासून त्या रिक्षा टेम्पोमध्ये विलगीकरणात आहेत. या संकटाच्या काळातही भावानेच आधार दिल्याचं त्या सांगतात. विलगीकरण असल्याने उत्पन्नाचा कुठलाही पर्याय नाही. स्वतःच्या औषधांचा खर्च कसा भागवायचा? सरकारकडून काही मदत मिळेल का? अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आज विलगीकरणाचा त्यांचा अकरावा दिवस असून, 14 दिवसानंतर त्या रिक्षा टेम्पोतून बाहेर येणार आहेत.
हेही वाचा -उजनीच्या पाण्याचा वाद शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानावर; इंदापूरचे आंदोलक ताब्यात