कन्नड (औरंगाबाद) - कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी श्रीराम कॉलनी येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे आणि संपर्कात आलेल्या 10 व्यक्तीचे नमुने घेण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहरातील श्रीराम कॉलनी येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 पर्यंत गेली आहे. दरम्यान, बुधवारी पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते , नायब तहसीलदार शेख हारून , मुख्याधिकारी नंदा गायकवाड , पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण लांजेवार उपस्थित होते.
श्रीराम कॉलनी येथील 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. संबंधित रुग्णांचे राहते घर व आजूबाजूची इमारत प्रतिबंधित केलेली आहे. आज या रुग्णाच्या संपर्कातील 10 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण पवार यांनी दिली.
आजपर्यंत कन्नड तालुक्यामध्ये एकूण 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 4 रुग्णांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. 6 रुग्णांचा उपचार ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे चालू आहे व 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कन्नड शहरामध्ये आज पर्यंत 16 रुग्ण व ग्रामीण मध्ये 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.