औरंगाबाद- काँग्रेसचा २०१९ च्या निवडणुकीचा जाहीरनामा पाहा, केंद्राने पास केलेल्या कायद्याच्याच मागण्या त्यांनी केल्या होत्या आणि आज ते विरोध करत आहेत. हे आश्चर्य आहे, त्यांचा विरोध अनाठायी आहे. गरिबी ही काँग्रेसची शक्ती होती. त्यांची व्होट बँक संपत असल्याने काँग्रेस शेतकरी कायद्याला विरोध करत आहेत. असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे.
शरद पवार यांनी विरोध केला नाही म्हणजे याला त्यांचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा आहे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे राज्यात कुठे गोंधळ झाला नाही, असे देखील बागडे यांनी सांगितले. पंजाबमध्ये गहू आणि तांदूळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना भीती आहे की हमीभाव मिळणार नाही, आणि व्यापारी शेतमालाचा भाव पाडून नुकसान करतील, म्हणून तृणमूलचा विरोध आहे. मात्र, तसे होणार नाही. हमी भाव मिळणारच आहे. पूर्वीच्या सरकारने जे निर्णय घेतले नाही, ते आम्ही घेतले आणि ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, असे सांगत सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतल्याचा आरोप हरिभाऊ बागडे यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी केंद्राने मंजूर केलेला कायदा फायद्याचा आहे. त्यात नुकसान नाही गैरसमज आहेत. असे मत व्यक्त करत कृषीमाल विकण्यासाठी बाजार समिती आणि खुले बाजारपेठ दोनही उपलब्ध असणार आहेत. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रक्रिया उद्योग करणारे व्यावसायिक थेट शेतातून माल विकत घेऊ शकतात. निर्यात करणारा व्यक्ती थेट शेतकऱ्यांकडून माल घेऊ शकतो, त्यामुळे मधले दलाल संपणार आहे, असे बागडे यांनी सांगितले.
उद्योजक थेट शेतकाऱ्यांसोबत करार करू शकतो. इतकेच नाही तर पेरणी आधीच हा करार करता येईल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याने केंद्राने घेतलेला निर्णय चांगला आहे. एखाद्या देशात कोणत्या पिकाचा तुटवडा आहे हे लक्षात घेऊन व्यावसायिक शेतकऱ्यांशी करार करू शकणार आहे. बाजार भावातील चढ उतारमुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागणार नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक आहे असे म्हणत, वाद झाला तर तीस दिवसात स्थानिक अधिकाऱ्यांना न्याय निवाडा करावा लागणार आहे. आज शेती मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नव्हता, मात्र तो आता त्यांना असेल. असे मत बागडे यांनी व्यक्त केले.
हमीभाव मिळणार आहे. सरकार यातून पळवाट काढू शकत नाही. त्याची अडचण शेतकऱ्यांना नाही. ऑक्टोबर नंतर कांदा निर्यात करावाच लागेल. कांदा सध्या जमिनीत आहे, तो ऑक्टोबरमध्ये येईल. आज उन्हाळी कांदा आहे, तो संपत आला त्यामुळे आज कांद्याचा तुटवडा आहे. मात्र, ऑक्टोबर नंतर नवा कांदा येईल आणि तेव्हा दर घसरतील. पुन्हा एकदा कांद्याची निर्यात करावी लागणार असल्याचे मत हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.