छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांच्या बंडाला वर्ष पूर्ण झाले. या दिवसाचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गद्दार दिन साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणी ही आंदोलन करण्यात आले. त्यात हातात खोका घेऊन गेलेल्या आमदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला. इतकेच नाही तर, आजचा दिवस म्हणजे गद्दार दिवस जाहीर करा, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली.
ठाकरे गटाने केले आंदोलन : आजच्या दिवशी 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड केले. त्यामुळे पक्ष फुटला आणि महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे युवा सेना शहराध्यक्ष आदित्य दहिवाल यांनी कार्यकर्त्यांसह काळा दिवस साजरा केला. उस्मानपुरा भागात हातात मोठमोठे खोके घेऊन, त्यावर '50 खोके एकदम ओके त्यात भाजपचे डोके' असे लिहीत शिंदे गटासह भाजपचा निषेध व्यक्त केला. आजचा दिवस कायमस्वरूपी गद्दार दिवस म्हणून साजरा करणार असे मत ठाकरे गटाचे आदित्य दहिवाल यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी आक्रमक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह सत्तेतून बाहेर पडत भाजपला साथ दिली त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने क्रांती चौक भागात तीव्र आंदोलन केले. '50 कोटी एकदम ओके' चा घोषणा देत हातात मोठे मोठे खोके घेऊन त्यांनी रस्त्यावर आपटले. इतकेच नाही तर आजच्या आधुनिक युगात डिजिटल व्यापार जास्त केला जातोय, म्हणून किंवा क्यूआर कोड देत मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचारासाठी पैसे पाठवा असे आवाहन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले. यावेळी हे खोके शिंदे गटासाठी नाही तर, त्यांना देणाऱ्या भाजपचा निषेध करण्यासाठी ठेवले आहेत. जोपर्यंत हे सरकार जाणार नाही, तोपर्यंत असेच आंदोलन करत राहणार अशी भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शहरात तगडा पोलीस बंदोबस्त : शहरात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहरातील वेगवेगळ्या भागात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेषतः ठाकरे गटाचे आंदोलन होत असलेल्या उस्मानपुरा भागात आणि राष्ट्रवादी तर्फे आंदोलन पोहोचलेल्या क्रांती चौक भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी हा बंदोबस्त कायम राहील अशी, माहिती पोलिसांकडून देण्यात आली.