पैठण (औरंगाबाद) - भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी व कारचालक हे गंभीर जखमी झाले. ही घटना आज (सोमवारी) साडेबारा वाजेच्या सुमारास बिडकीन-निलजगाव रस्त्यावरील डीएमआयसीजवळ घडली घटना.
पत्नीसह कारचालक गंभीर -
पैठण तालुक्यातील बालानगर येथील रहिवासी दुचाकीस्वार हरिश्चंद्र उत्तमराव गोर्डे व गिता हरिश्चंद्र गोर्डे हे दोघे पती-पत्नी बालानगरवरून आपली दुचाकीने (क्र. एमएच 20 ईबी 9363) बिडकीनकडे कामानिमित्त येत होते. औरंगाबादकडून बालानगरकडे भरधाव वेगात जाणारी कारने (क्र. टीएन 78 एक्स 8525) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की हा अपघात घडताच दुचाकीने भीषण पेट घेऊन दुचाकी जळून खाक झाली. तर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत पलटी झाली. यात दुचाकीस्वार हरिश्चंद्र गोर्डे हे घटनास्थळावरून दहा ते पंधरा फूट दूर जाऊन पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी गीता गोर्डे यांच्यासह कारचालक गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा - आजपासून मुंबईकरांचा टॅक्सी-रिक्षाचा प्रवास महाग; नाईटसाठी अधिक भाडेवाढ
या घटनेची माहिती निलजगाव ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत यांनी माहिती मिळाल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोन्ही जखमींना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर रिश्चंद्र गोरडे यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद बिडकीन पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस करत आहेत.