छत्रपती संभाजीनगर Cabinet Meeting : (औरंगाबाद) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगानं मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन आज संभाजीनगरमध्ये करण्यात आलं. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून सरकारनं 600 कोटींच्या कामाला मंजुरी दिलीय. त्यात 15 हजार कोटी रुपयांची सिंचनाची कामं असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. विरोधकांनी बैठक होऊ नये, म्हणून प्रयत्न केले. मात्र, आम्ही नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले. मागील बैठकीतील बहुतांश निर्णयांची अंमलबजावणी झालीय. काही निर्णय उद्धव ठाकरे यांच्यामुळे पूर्ण झाले, नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
मराठवाड्यासाठी 60 हजार कोटी : बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या. मात्र खऱ्या अर्थानं मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मराठवाड्याच्या विकासासाठी 600 कोटींच्या कामांना मंजुरी देत असल्याची माहितीही त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विरोधक म्हणतात मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात, मात्र निर्णय होत नाही. मात्र, आमच्या सरकारनं वर्षभरात सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले. बैठकीत 35 सिंचन प्रकल्पाला सुधारित मान्यता दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
सिंचनासाठी 14 हजार कोटींची तरतूद : आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही दोनच मंत्री होतो. तेव्हापासून जलसंपदा विभागाचे निर्णय घेतले आहेत. सिंचन अनुशेषासाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत देखील नियोजन केलं जातंय. यावर 13 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. नियोजन 1 हजार 608 कोटीचं आहे. 12 हजार 938 कोटी सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग 709 कोटी, पर्यटन 95 कोटी, पैठण संत ज्ञानेश्वर उद्यान निधी तरतूद, शहरातील 3 पुरातन पूल अशा कामांना मंजुरी देण्यात आलीय. पावसानं ओढ दिल्यानं नुकसान होतंय, त्या ठिकाणी शेतकरी विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळेल. नदी जोड प्रकल्पसाठी 14 हजार वगळून एकूण 45 हजार कोटी रुपयांचा निर्णय झाला आहे. 21 दिवसांच्या खंडाबाबत आम्ही पीक विमा कंपन्या सोबत बोलतोय. नियम बदलून मदत होईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
आदर्शबाबत, जमिनी ताब्यात घेतल्या : आदर्श बँकेच्या ठेवीदारांना सोबत घेऊन खासदार जलील यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी उभं केलेलं सुरक्षा कवच तोडून जलील नागरिकांना घेत बैठक स्थळी निघाले असता, पोलिसांनी बळाचा वापर केला. याबाबत बोलत असताना खासदार जलील यांच्यासोबत बोलणं झालं आहे. बँकेच्या असलेल्या मालमत्ता जप्त करण्याचं काम आम्ही करत आहोत. लवकरच नागरिकांना न्याय मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. यापुढं शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशिव झालेलं आहे. आधीच्या सरकारनं राजीनामा देण्याच्या आधी तडकाफडकी शहराचं नाव बदललं होतं. मात्र आम्ही तसं केलं नाही. नामांतराची अधिकृत अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. यापुढे कुठलीही कायदेशीर अडचण येणार नाही, अशी सोय देखील करण्यात आली आहे, असं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
विरोधकांना फटकारलं : 2016 मधे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाचं काय, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यावर मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत माहिती सादर केली. यावेळच्या बैठकीतील निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री करतील, मात्र विरोधक स्वतः काहीही करत नाहीत, फक्त बोट दाखवताय, नावं ठेवतायत. विरोधकांनी बैठक होऊ नये, असे प्रयत्न केले. आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी अडीच वर्षात काय केलं ते सांगावं. 4 ऑक्टोबर 2016 बैठकीत 31 निर्णय घेण्यात आले होते. 2017 ला आढावा घेतला तेव्हा त्यात 10 विषय पूर्ण झालेले होते. तर, 15 अंतिम टप्प्यात आणि 6 अपूर्ण होते. आज 31 पैकी 23 पूर्ण झाले आहेत. 7 प्रगतीपथावर आहेत, तर एक उद्धव ठाकरेंच्या काळात कुठेतरी गेलाय असं टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडलंय. जालना सीड पार्कला ठाकरे सरकारनं मान्यता दिली नव्हती, आम्ही देतोय. उद्धव ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला. आता आम्हाला विचारताय. यात आता केंद्र मदत करणार आहे. मराठवाड्यात बैठक घेतल्यावर आम्ही इथल्या विषयांना प्राधान्य दिलय असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
हेही वाचा -
- Sanjay Raut : 'राज्यात दोन भामटे आणि एका ठगाची युती', संजय राऊतांची जळजळीत टीका
- Raosaheb Danve Attack On Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट, मालक दिसल्यावरच 'टिव टिव' करतो; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
- Devendra Fadnavis : सत्तेत असताना माशा मारल्या का? देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल