औरंगाबाद - जिल्ह्यातील पैठण वॉटर ग्रीडला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पहिली वॉटर ग्रीड असून 285 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुर करण्यात आले आहेत. या वॉटर ग्रीडमुळे पैठण शहरासह तालुक्यातील जवळपास 160 गावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी गुरुवारी (आज) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पैठण शहराच्या उशाला जायकवाडी धरण असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून शहर आणि काही गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम होता. दुष्काळात अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. आता पैठण वॉटर ग्रीडमुळे पैठणकरांचा आणि 158 गावातील गावकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. 265 कोटीच्या या योजनेत 8 मुख्य संतुलित जलकुंभ उभारण्यात येणार असून 46 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेतील सर्व गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. तर 160 गावांनामध्ये गरजेनुसार जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. पैठण तालुक्यातील 160 गावांना जोडणारी वॉटर ग्रीड जवळपास 677 किमीची असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पैठण तालुक्यांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
'अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल'
प्रस्तावित वॉटर ग्रीडमध्ये 2054 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी कसे मिळेल याचे नियोजन करण्यात आले आहे. पंपिंग कालावधी 16 तास मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेचा उद्धभव जायकवाडी जलाशयाच्या बुडित क्षेत्रात असणार आहे. या गावात मुख्य संतुलित जलकुंभ, गुरुत्व जल वाहिनी प्रस्तावित वॉटर ग्रीडमध्ये आखातवाडा, दावरवाडी, अब्दुल्लापुर, नांदर, तोंडोळी, बाळानगर, लिंबेगाव, निलजगाव या गावात मुख्य संतुलित जलकुंभ उभारण्यात येणार आहे. मुख्य जलकुंभमधून गावातील जलकुंभापर्यंत गुरुत्व जल वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे.
हेही वाचा -राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका; घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे