औरंगाबाद- जिल्ह्यातील औरंगाबादच्या सातारा परिसरात बहीण-भावाच्या हत्येचे गूढ चांगलेच वाढले आहे. हत्येनंतर झालेल्या पोलीस तपासात घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
क्रुरतेने हत्या..
मंगळवारी रात्री सातारा परिसरातील एका बंगल्यात किरण आणि सौरभ खंदाडे (राजपूत) यांचा मृतदेह आढळून आला. गळा चिरुन हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह बाथरुममध्ये टाकल्याचे समोर आले होते. त्यानुसार सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास करण्यासाठी चार पथक तयार केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
'तो' संवाद ठरला अखेरचा...
घटना घडलेला सातारा येथील एमआयटी महाविद्यालय परिसर शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखली जातो. याच परिसरात लालचंद खंदाडे (राजपूत) यांनी काही वर्षांपूर्वी एक बंगला किरायाने घेतला होता. पत्नी दोन मुली आणि मुलगा यांच्यासह ते या बंगल्यात राहत होते. लालचंद हे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गावाकडे शेतीच्या कामांसाठी पत्नी आणि मोठ्या मुलीसह ते गावी गेले होते. तर किरण आणि सौरभ हे घरीच होते. यादरम्यान ही घटना घडली. दुपारी किरणने आई वडिलांना फोन केला होता. तो संवाद त्यांचा शेवटचा ठरला.
घरातील सोनेही चोरीला...
सायंकाळी लालचंद पत्नी आणि मुलीसह घरी आल्यावर बंगल्याचा दरवाजा उघडाच होता. आवाज दिल्यावरही कोणीही बाहेर येत नव्हते. त्यामुळे लालचंद खंदाडे बंगल्यात गेले असता बाथरुममध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बंगल्याची तपासणी केली असता घरातून दीड किलो सोने चोरीला गेल्याचेही समोर आले.
पोलिसांचे चार पथक तयार...
चोरीच्या उद्देशाने आलेल्या लोकांनीच हत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यानुसार आता पोलिसांचे चार पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. घरात जबरदस्ती घुसल्याचे कुठलेही पुरावे अद्याप समोर आले नाहीत. त्याचबरोबर ही भरदिवसा झालेली घटना असून बंगल्यात जाताना किंवा बाहेर येताना आसपासच्या नागरिकांना कोणीही निदर्शनास आले नाही. हत्या होत असताना दोघांनी आरडाओरडा केली नाही का? असाही प्रश्न आहे. त्यामुळे या हत्येचे गूढ वाढले आहे. याबाबत पोलीस लवकरच छडा लावतील, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.