औरंगाबाद - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची थाप मारून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर घडली. जवळपास तीनशे लोकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज गुंतवणूकदारांनी व्यक्त केला. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात अक्षय भुजबळ आणि इतर साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक
औरंगाबादचे व्यावसायिक विवेक पाटील यांची काही लोकांच्या माध्यमातून अक्षय भुजबळशी ओळख झाली. गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा देतो असा आश्वासन अक्षय भुजबळ आणि साक्षीदार यांनी दिले. त्यावेळी पहिल्यांदा एक लाख, नंतर पाच लाख आणि नंतर सात लाख अशा पद्धतीने गुंतवणूक केली. सुरुवातीला चांगला परतावा त्यांना मिळाला. आपले घर घ्यायचे स्वप्न बाजूला ठेवत त्यांनी जमवलेले पैसे कमोडिटी ट्रेडिंग आणि शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवले. थोडे थोडे करत जवळपास 70 ते 75 लाख रुपये त्यांनी योजनेमध्ये गुंतवले. त्यानंतर दोन वर्षांपासून परतावा बंद झाला. वारंवार पाठपुरावा करूनही, एकही रुपया मिळेनासा झाला. अक्षय भुजबळ यांच्याशी वारंवार संपर्क केला, सुरुवातीला पैसे मिळतील असे आश्वासन मिळत होते. मात्र त्यानंतर प्रतिसाद बंद झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर पाटील यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात आपली तक्रार दिली. अशीच व्यथा भाऊसाहेब गावंडे यांची आहे. गावंडे यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली बचत ठेव मोडली. विशेष म्हणजे अक्षय भुजबळ यांना सोबत घेऊन बँकेत जाऊन ठेव मोडून पैसे दिले. मात्र मुलीच्या लग्नाचे पैसे घेऊन भुजबळ याने पोबारा केला.
सदस्य जमवण्यासाठी घेतला धार्मिक आधार
सुरुवातीला साखळी पद्धतीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अक्षय भुजबळ यांनी धार्मिक आधार घेतला. कोणाला स्वामी समर्थ महाराजांचा भक्त म्हणून तर कोणाला इतर देवाचा भक्त म्हणून संपर्क करू लागला. मी देखील आपल्यासारखाच भक्त आहे. त्यामुळे आपल्याला फसवू शकत नाही. अशा पद्धतीने आश्वासन देत होता. त्यामुळे देव वेड्या असलेल्या अनेक व्यवसायिकांनी अक्षय भुजबळ यांच्यावर विश्वास ठेवला आणि गुंतवणूक केली. मात्र देवाच्या नावाने गुंतवणूक करणाऱ्या भुजबळ याने फसवणूक केल्यामुळे आता देवावरचा देखील विश्वास उठला आहे, अशी भावना अनेक गुंतवणूकदारांनी व्यक्त केली.
छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राज्यातील सातशेपेक्षा अधिक लोकांची तीस कोटी रुपयांहून अधिक फसवणूक करणाऱ्या अक्षय उत्तम भुजबळ यांच्यावर छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मागील चार महिन्यांपासून या प्रकरणातील तक्रारदार पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे तक्रारी देत होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची शहानिशा सुरू करण्यात आली. त्यानुसार अखेर छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात औरंगाबादेत 66 लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार हा आकडा वाढण्याची शक्यता असून तीस कोटींपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दीपक लंके हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...