औरंगाबाद - एका महिलेसोबत पंधरा वर्षे अन्याय करणारा व्यक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवाय महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या आवाज का उठवत नाहीत, असेही सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
शरद पवार गप्प का आहेत...?
करुणा मुंडे रविवारी (दि. 5 सप्टेंबर) परळीमध्ये दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडणार आहेत. यासंदर्भात त्यांनी काल फेसबूक लाईव्हवरून धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात करत पुराव्यासकट बोलणार असल्याची सांगितले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये एका महिलेवर 15 वर्षे अन्याय करणारा व्यक्ती मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो, धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी शपथपत्र दिले होते, त्यात दोन बायकांचा उल्लेख केला होता का..? आता तेही समोर आले पाहिजे'. शरद पवार गप्प का आहेत, असा प्रश्न चांद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, राज्यात गेंड्याची कातडी असलेले सरकार असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.
संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी
नारायण राणेंना 'त्या' विधानावरून अटक केली, संजय राऊत कोथळा काढण्याची भाषा करतात त्यांना अटक केली पाहिजे. कोथळा काढायला हिंमत लागते. मी पाठीत खंजीर खुपसेन म्हटल्यानंतर हे त्यांना फार लागलं आहे. शिवसेनेवर टीका केल्यावर नारायण राणे यांना अटक केली होती.
एकटे राऊत का बोलतात..?
शिवसेनेने विचार करावा, संजय राऊत कोणाचे आहेत. राऊत शरद पवारांचे काम करतात का, अनिल देसाई, सुभाष देसाई, रामदास कदम कुठे आहेत. एकटे राऊत का बोलतात त्यांना सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे का बाकीचे नेते कुठे आहे, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
16 वेळा काँग्रेसने लोकशाही मार्गाने आलेले सरकार बरखास्त केले
केंद्र सत्तेचा गैरवापर करत आहे या शरद पवारांच्या टिकेवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेससह घटक पक्षावर निशाणा साधला. पवारांना घटना मान्य नाही. 16 वेळा काँग्रेसने लोकशाही मार्गाने आलेले सरकार बरखास्त केले. 16 वेळा राष्ट्रपती राजवट लावली तेव्हा शरद पवार झोपा काढत होते का, आम्ही कुठल्याही राज्यातील सरकार बरखास्त केली नाही, सरकारला घटनेचा अभ्यास नसावा, अशा भाषेत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
हेही वाचा - कोरोना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, माझ्याशी नाही - चंद्रकांत पाटील