औरंगाबाद - भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी भाजपाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यापुढे भाजपाविरोधात काम करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तोंडावर जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्याविरोधात प्रचार करण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार मंगळवारी गायकवाड राष्ट्रवादीत प्रवेश करतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दुसऱ्यांदा राष्ट्रवादीत प्रवेश -
भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची दुसरी वेळ आहे. याआधी जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपातर्फे दोनवेळा पदवीधर मतदारसंघाची आमदारकी मिळवली होती, तर बीड मतदारसंघातून तीन वेळा खासदारकी मिळवली होती. केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद मिळवणाऱ्या जयसिंगराव गायकवाड यांनी याआधी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, काही वर्षांत त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश करत राष्ट्रवादीला रामराम केला. त्यानंतर भाजपातर्फे गायकवाड यांना किसान मोर्चा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र, गेल्या वर्षांपासून पक्षाने कुठलीच जबाबदारी दिली नसल्याने भाजपा सोडण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेत दुसऱ्यांदा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचे संकेत दिले. त्यानुसार मंगळवारी जयसिंगराव गायकवाड पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असून मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.