कन्नड (औरंगाबाद) - तालुक्यातील गौताळा अभयारण्यात पक्षी सप्ताह निमित्त 'गौताळा पक्षी निरीक्षण' कार्यक्रम संपन्न झाला. गौताळा व हिवरखेडा नियत क्षेत्रात पक्षी निरीक्षण करण्यात आले असून यामध्ये गौताळा अभयारण्यात एकूण १५ पक्षी दिसले. त्यात लाल बुड्या, बुलबुल, साळुंकी, जंगली मैना, लहान तपकिरी, होला, दयाळ, कोकिळा पावश्या, टकाचोर, भारद्वाज, माळ टिटवी, वेडा राघू कोतवाल, चिरक असे पक्षी निरीक्षणादरम्यान दिसून आले. पक्ष्यांची ओळख स्थानिक कर्मचारी यांनी नागरिकांना करून दिली. पक्षी निरीक्षण दरम्यान रानडुक्कर, नीलगाय असे प्राणी दिसून आले.
या प्रसंगी अभयारण्यातील दुर्मिळ औषधी वनस्पतीची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. त्यात विविध आयुर्वेदिक कंदमुळे त्यात तांदूळ कंद, वराह कंद अशा आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती दिली. तसेच ९ प्रकारचे जंगलातील कोळी त्यात वूड स्पायडर, सिग्नेचर स्पायडर व १० प्रजातीचे फुलपाखरू व ८ चतुराच्या प्रजातींची ओळख करून देण्यात आली. अशा पद्धतीने पक्षी निरीक्षण कार्यक्रम पार पडला. यात कन्नड वन्यजीवचे वनपरिक्षेत्र सहाय्यक आर. बी शेळके, नागद वन्यजीव परिक्षेत्राचे सागर ढोले तसेच दोन्ही परिक्षेत्रमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विभागीय वनअधिकारी व्ही.एन. सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक पैठण राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक कन्नड एस. पी. काळे, रंजन देसाई, तसेच कन्नड व औरंगाबाद येथील स्थानिक नागरिक व ज्येष्ठ पत्रकार यांनी पक्षी निरीक्षणमध्ये सहभाग नोंदवला.
अभयारण्यातील वास्तव्य आसलेल्या पक्षी यांच्या जाती त्यांचे गुणधर्म, यांची माहिती व्हावी त्यांचे संगोपन होऊन संवर्धन व्हावे, या उद्देशने पक्षी निरीक्षण कार्यक्रम घेतला जातो. मानवी जीवनात तसेच निसर्गाचा समतोल रहावा यासाठी दुर्मिळ होत चाललेल्या जातीचे संवर्धन झाले पाहिजे आदी माहिती विभागीय वन अधिकारी व्ही.एन. सातपुते यांनी दिली.