औरंगाबाद - आजकाल सोशल मीडियावर खासगी गोष्टी टाकणे ही नेहमीचीच बाब झाली आहे. त्यात आपल्याकडे असलेल्या काही गोष्टींचे प्रदर्शन करणे अनेक वेळा अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. पोलीस आणि सायबर एक्स्पर्ट नेहमी याबाबत आवाहन करूनही आजही अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या खासगी गोष्टी टाकण्यात धन्यता मानतात. त्यामुळे अशा गोष्टी आपल्या किंवा आपल्या कुटुंबीयांच्या जीवावर बेततात, अशीच एक घटना औरंगाबादेत उघडकीस आली.
औरंगाबादच्या सातारा परिसरात राहणाऱ्या किरण आणि सौरभ खंदाडे या बहिण-भावाची हत्या झाल्याची हृदय हादरून देणारी घटना सोमवारी रात्री समोर आली. या प्रकरणात चुलत भावाने आणि मेव्हण्यानेच हत्या केल्याचे उघड झाले. या घटनेलाही 'सोशल मीडिया'ची किनार आहे. किरण आणि सौरभच्या आईने दिवाळीला आपल्या स्टेटसवर टाकलेला एक फोटो कारणीभूत ठरला. त्या फोटोत दीड किलो सोने दिसत होते, अशा स्वरूपाचा तो फोटो होता.
किरण आणि सौरभची आई अनिता लालचंद खंदाडे यांनी दीपावलीच्या काळात सोने परिधान केलेला एक फोटो नुकताच आपल्या स्टेट्सवर ठेवला होता. याच फोटोने या घटनेचा पाया रचला. जेमतेम परिस्थितीत जगणाऱ्या सतीश खंदाडे आणि अर्जुन राजपूतला श्रीमंत होण्याची लालसा आली. त्या क्षणापासून हे सोने मिळवण्याची इच्छा त्यांच्या मनात घर करू लागली. मात्र, संधी मिळत नव्हती.
सोमवारी शेतीच्या कामासाठी आपले काका लालचंद खंदाडे आपल्या पत्नी आणि मोठ्या मुलीसह जालन्याला येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याच वेळी त्यांनी औरंगाबादला येण्याचे नियोजन केले. औरंगाबादला आल्यावर दीड किलो सोन्यासाठी खंदाडे यांचा मुलगा आणि मुलगी दोघांचा खून केला. स्टेटसवर ठेवलेला एक फोटो त्यांच्या मुलांच्या हत्येचे निमित्त ठरला.
हृदय पिळून टाकणाऱ्या या घटनेत आरोपी गजाआड झाले आहेत. मात्र, सोशल मीडियावर शो बाजीसाठी टाकलेल्या एका फोटोने मोठा गुन्हा घडला. म्हणून सोशल मीडियावर काहीही टाकताना थोडा विचार करा, असे आवाहन पोलीस नेहमीच करतात. मात्र, सर्व साधारण माणूस त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा जन्म होतो.
औरंगाबाद पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्यानुसार आजच्या काळात घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये सायबर क्राईमशी संबंधित गुन्हे घडत आहेत. फेक अकाऊंट, मोबाईल क्रमांक यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत. सोशल मीडियावर आपले खासगी आयुष्य टाकताना अनेक लोक खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे वाईट वृत्तीच्या लोकांच्या नजरेत काही नको त्या गोष्टी येतात आणि गुन्ह्यांचा जन्म होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर खासगी बाबी टाकताना सावध राहिले पाहिजे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त डॉ. कोडे यांनी केले.