औरंगाबाद - राज्यातील बंजारा समाजने आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बंजारा समाजाच्या 30 संघटनांनी दिली. 28 जुलैला औरंगाबादमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
बंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला गेला. मात्र, आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी बंजारा समाजाला कधीही न्याय दिलेला नाही. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाजाला सत्तेत आल्यावर आपण न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिल्याने बंजारा समाज आता प्रकाश आंबेडकरांसोबत असेल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन बंजारा संघटनांनी दिली.
बंजारा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलन करत होता. मात्र, त्याचा राजकीय लोकांनी फक्त फायदा घेतला. समाजाच्या भवितव्याचा प्रश्न कोणीही मार्गी लावला नाही, असा आरोप बंजारा समाजाच्या विविध संघटनांनी केला. धनगर समाजाने एकत्र येत आपल्या समाजाच्या अनेक मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्या. मात्र, बंजारा समाजाला तसे करता आले नाही. त्यामुळे बंजारा समाज आता एकत्र येऊन प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एक बैठक झाली असून, प्रकाश आंबेडकर यांनी आपण सत्तेत आल्यावर बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करू, असे आश्वासन दिले. 28 जुलैला औरंगाबाद येथे मेळावा घेऊन बंजारा समाज वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करणार आहे.
या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर समाज बांधवांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.