औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. शिवसेनेचे मतदार फुटल्याने निवडणूक लढवत असलेल्या दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने पेच निर्माण झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. आता ही निवडणूक उद्या (४ जानेवारी) होणार आहे.
शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना भाजपच्या सदस्यांनी पाठिंबा देत महाआघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाआघाडीच्या उमेदवार मीनाताई शेळके आणि देवयानी डोणगावकर यांना 29 - 29 अशी समान मते मिळाली. त्यामुळे वाद झाला. या वादामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी महाआघाडी अस्तित्वात आली. त्यावेळी शिवसेनेला अध्यक्षपद दिल्याने आता पुढील कार्यकाळ काँग्रेसला देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. त्यानुसार महाआघाडीतर्फे मीनाताई शेळके यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज केला. तर भाजपतर्फे अनुराधा चव्हाण यांनी अर्ज केला. महाआघाडीचा विजय पक्का मानला जात असताना शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. त्यांनी काँग्रेसचे काही सदस्य आपल्या बाजूने वळवत निवणुकीत रंगत आणली. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी आपला अर्ज मागे घेतला. आणि भाजपच्या सर्व सदस्यांनी शिवसेना बंडखोर देवयानी डोणगावकर यांना पाठिंबा दिला. सभागृहात एकूण 58 सदस्य उपस्थित होते. दोनही उमेदवारांना 29 - 29 अशी समान मते मिळाली.
शिवसेनेच्या छाया अग्रवाल यांनी महाआघाडीला हात वर करुन मतदान केले. मात्र, त्यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे 29 आणि 28 असे मतदान मोजण्यात आले. देवयानी यांचा विजय पक्का मानला जात असताना महाआघाडीच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला. अशा परिस्थिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया स्थगित करत 4 जानेवारी शनिवार रोजी दुपारी २ वाजता मतदान प्रक्रिया पार पडेल असे जाहीर केले. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड लांबणीवर पडली आहे.
सत्तार समर्थकांनी दिली शिवसेना बंडखोराला साथ
औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजप 23, शिवसेना 18, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 2, मनसे 1, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसच्या 16 सदस्यांमध्ये 6 सदस्य शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थक आहेत. या सदस्यांनी महाआघाडीच्या उमेदवाराला मतदान करणे अपेक्षीत असताना काही सदस्य फुटले. त्यांनी शिवसेना बंडखोर देवयानी डोणगावकर यांना मतदान केले. भाजप आणि शिवसेना बंडखोर यांच्या मतांमुळे देवयानी यांना महाआघाडीच्या उमेदवार मीनाताई शेळके यांच्या समान मते मिळाली. सत्तार समर्थक सदस्यांमुळे महाआघाडीचा अध्यक्ष होण्याचे समीकरण बिघडल्याचे पाहायला मिळाले.
महाआघाडीचे सदस्य फुटल्याने शिवसेना आमदार डॉ. आंबदास दानवे यांनी मान्य केले. भाजपने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केल्याचा आरोप दानवे यांनी केला. तर निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या उमेदवाराला 29 आणि विरोधकांना 28 मते मिळाल्याने आम्हालाच विजय मिळाला आहे. त्यामुळे आमच्या उमेदवाराला विजय घोषीत करण्याची मागणी भाजप आमदार अतुल सावे यांनी केली आहे.