औरंगाबाद - वाहन परवान्याची मुदत संपलेल्या वाहनधारकांना आरटीओकडून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या वाहनांची सर्व प्रकारची तपासणी शिल्लक आहे. अशा वाहनांची तपासणी फेब्रुवारीपासून कोरोनामुळे थांबवण्यात आली होती. आता त्याला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विमा, पीयूसी, फिटनेस आदीसाठी ही मुदतवाढ आहे. ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन प्रक्रियेने वाहनांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
कोरोनामुळे आरटीओ कार्यालय सुरूवातीच्या काळात काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. शासनाच्या आदेशाने आरटीओची कामे पूर्ववत सुरू झाली आहेत. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता आता बहुतांश कामे ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. त्यामुळे कागदपत्रांची हाताळणी कमी झाली आहे. लर्निंग लायसन्स, पर्मनंट लायसन्स, विविध प्रकारची शुल्क आकारणी आणि कर आकारणी देखील आता ऑनलाइन पध्दतीने होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि करोडी या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्जानंतर कार्यालयाकडून दिलेल्या वेळेनुसार वाहनांची तपासणी केली जात आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील असलेल्या आरटीओ कार्यालयात कोरोनापूर्वी साधारणत: दररोज एक हजारापेक्षा जास्त वाहनधारकांचा वावर असे. आता ऑनलाइन प्रक्रियेमुळे ही संख्या शंभर ते दिडशेपर्यंत खाली आली आहे. अतिमहत्त्वाच्या कामासाठीच वाहनधारक आरटीओ कार्यालयात जात आहेत. त्यांचीही सुरूवातीलाच स्क्रीनिंग करुन मग कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. कार्यालयात विविध विभागांना त्यांचा विशिष्ट कोटा ठरवून दिला आहे. त्यानुसारच कार्यालयातील कामकाज होत आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे कार्यालयातील विनाकारण गर्दी कमी झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी(आरटीओ) संजय मेत्रेवर यांनी दिली.
करोडी परिसरातील आरटीओ कार्यालयात सर्व वाहने सॅनिटाईज केली जात आहे. त्यानंतरच त्यांची पुढील तपासणी होते. याठिकाणी नव्याने पाचमजली आरटीओ कार्यालय उभारले जात आहे. तेथे दररोज चाळीस वाहनांची तपासणी केली जाते. ऑनलाइन पध्दतीने नोंदणी केल्यानंतर आरटीओ कार्यालयाने दिलेल्या वेळीच वाहन धारकांना बोलावून त्यांच्या वाहनांची तपासणी होत आहे.
दरम्यान, अनेक वाहनधारकांच्या परवान्याची मुदत संपली आहे. ऑनलाइन प्रक्रियेबाबत त्यांना आरटीओ कार्यालयाकडून संपूर्ण माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकजण संभ्रमात असल्याचे नागरिकांनी सांगितले. आरटीओने सर्व ऑनलाईन माहिती सुटसुटीत करावी, अशीही मागणी त्यांनी केली.