औरंगाबाद - महानगरपालिकेकडून पाण्याच्या करामध्ये कपात केली जाणार आहे. औरंगाबादकरांसाठी हा सुखद धक्का मानला जात आहे. कारण, भारतात सर्वाधिक पाण्यावरचा कर हा औरंगाबाद महानगरपालिकाच वसूल करत आहे.
औरंगाबादकरांना वर्षभरात अवघे ७० ते ८० दिवस पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पालिका जो कर आकारते त्या कराच्या मानाने दिला जाणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पहिल्याच सर्वसाधारण सभेत पालिका पाण्यावरचा कर कमी करणार आहे, असे घोडेले यांनी सांगितले. सध्या औरंगाबादकरांना वर्षाकाठी ४ हजार ५० रुपयांचा कर पाण्यासाठी द्यावा लागतो. मात्र, ३६५ दिवसांपैकी अवघे ७० ते ८० दिवसच त्यांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कराच्या मानाने केला जाणारा पाणीपुरवठा हा खूपच कमी हा निर्णय पालिकेने घेतला आहे.
पालिकेकडून दीड ते दोन हजारांनी पाणी कर कमी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, हा निर्णय आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तर घेतला नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.