औरंगाबाद - मार्च महिन्यापासून बंद करण्यात शहर बससेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळी पाच वाजल्यापासून महानगरपालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांच्या हस्ते बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
सुरक्षेच्यादृष्टीने घेतली जाणार काळजी -
औरंगाबादमध्ये आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सिटीबस सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 9 मार्गावर सिटीबस धावणार असून दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 28 मार्गांवर बस सुरू करण्याचे नियोजन मनपाने केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रत्येक फेरीनंतर बस स्वच्छ केली जाणार आहे. सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत बस सेवा नागरिकांसाठी सुरू राहणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली.
प्रवाशांसाठी आकर्षक योजना -
कोरोनामुळे विस्कळीत झालेली बस सेवा पुन्हा सुरळीत होण्यासाठी मनपाकडून प्रवाशांसाठी आकर्षक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. 60 रुपयात दिवसभर प्रवास, 5 दिवसांचे पैसे भरून 7 दिवस प्रवास, 60 दिवसांचे पैसेभरून 90 दिवस प्रवास अशा योजना प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.
वाहकांच्या आहेत तक्रारी -
औरंगाबादमध्ये आठ महिन्यानंतर सिटी बस पूर्वपदावर येत आहे. आज सिटी बसचा 'पुनश्च हरि ओम' होत असताना पहिल्याच दिवशी बसच्या वाहकांनी तिकीट मशीनमध्ये गडबड असल्याची तक्रार केली आहे. औरंगाबाद सिटी बसच्या वाहकांनी आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांना घेराव घालून तिकीट मशीनमध्ये गडबड असल्याचे सांगितले.