कन्नड (औरंगाबाद) - पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. ३० जुलैपर्यंत कन्नड तालुक्यातील आठही महसूल मंडळात चांगला पाऊस झाल्याने ३० जुलैपर्यंत ५१७.६२ मिली मिटर पावसाची नोंद झाली. कन्नड तालुक्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात बुधवारी रात्री झालेल्या अडीच तास झाला. यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. गुरुवारी तालुक्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
कन्नड शहरासह तालुक्यातील गावांची तहान भागवणारे अंबाडी आणि पूर्णा-नेवपूर धरण १०० टक्के, अंजना-पळशी ८० टक्के, शिवना टाकळी 69 टक्के हे प्रकल्प भरले आहेत. गडदगड, गौताळा, सातकुंड, वडोद, निंभोरा हे लघु प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. ही नोंद पाटबंधारे उपविभागीय औरंगाबाद क्रमांक ३ व १ या विभागाने ३० जुलै रोजी घेतली आहे. कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या शिवना टाकळी प्रकल्पात बुधवारी एका दिवसात २५ टक्के पाण्याची आवक झाल्याने शिवना टाकळी प्रकल्प ६५ टक्के भरला आहे.
तालुक्यात सुरुवातीपासून पावसाचे अनुकूल वातावरण होते. तालुक्यातील गौताळा, निंभोरा, सातकुंड, अंबा, वडनेर या लघु प्रकल्पातील पाणीसाठा जून अखेर जोत्याखाली होता. अनेक प्रकल्प कोरडे होते. परंतु, गेल्या काही दिवसांत तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात चांगल्या पावसाची नोंद झाली. औराळा, मुगंसापूर हे प्रकल्प वगळता सर्व प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात चागली वाढ झाली आहे. पावसाची स्थिती अशीच समाधानकारक राहीली तर येणाऱ्या काही दिवसात तालुक्यातील सर्व प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा उपलब्ध होईल. तसेच तालुक्यातील नागरिकांचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.
संपूर्ण कन्नड शहराची तहान अंबाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्या अंबाडी धरणात पाण्याच्या पातळीत मागील जून अखेर १.६४ दशलक्ष घनमिटर म्हणजे १६ टक्के पाणीसाठा होता. परंतु ३० जुलै अखेर पाण्याची आवक या धरणात झाल्याने अंबाडी धरण १०० टक्के भरले आहे.
१ जुन ते २७ जूलै २०२० पर्यंतची पाटबंधारे उपविभाग औरंगाबाद क्रमांक (३) च्या अंतर्गत येणाऱ्या कन्नड तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पात संध्या असलेला पाणीसाठ्याची टक्केवारी.
मध्यम प्रकल्प : अंबाडी - १०० टक्के.
पूर्णा नेवपूर : १०० टक्के, अंजना पळशी - ७८ टक्के, शिवना टाकळी ६५ टक्के.
लघु प्रकल्प : गडदगड - १०० टक्के. निंभाेरा- १०० टक्के. गाैताळा - १०० टक्के. सातकुंड - १०० टक्के. वडोद १०० टक्के. अंबा - १०० टक्के, रिठ्ठी माेहर्डा - ५२ टक्के. माटेगाव - ८१ टक्के, सिरजगाव - ५२ टक्के.
शहराला पाणी पुरवठा करणारा अंबाडी प्रकल्प 10 वर्षांनी भरला असून, नगराध्यक्षा स्वाती संतोष कोल्हे व गटनेते संतोष किसनराव कोल्हे या दाम्पत्याच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.