औरंगाबाद - पैठण तालुक्यातील तोंडोळी दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणातील सातही दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शनिवारी (दिनांक 30 ऑक्टोबर) देण्यात आली. या टोळीकडून मागील वर्षभरात पाच आणि यंदाचे आठ असे तेरा गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे.
दहा दिवसांत आरोपी गजाआड
तोंडोळी प्रकरणानंतर ग्रामीण पोलिसांनी दहा दिवसात या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीतील सात आरोपींनी औरंगाबाद, पैठण, गंगापूर या तालुक्यांसह विविध वस्त्यांवर हैदोस घातल्याचे समोर आले आहे. यात चिकलठाणा परिसरातील खुनाचा समावेश आहे. यामध्ये प्रभू शामराव पवार, विजय जाधव, सोमनाथ राजपूत, नंदू बोरसे, अनिल राजपूत, किशोर जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव अशा सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सातही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
हेही वाचा : CCTV : बुलडाणा अर्बन बँकेच्या शहागड शाखेवर दरोडा; एक कोटीचा मुद्देमाल लंपास
तोंडोळीत एक दिवस आधी केली होती रेकी
तोंडोळी येथे दरोडेखोरांनी लूटमार करत दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केला होता. मात्र दरोडा टाकण्याच्या एक दिवस आधी या टोळीने पूर्ण परिसराची पाहणी केली होती आणि त्यानंतर शेत वस्तीवर जाऊन दरोडा टाकला. दरोड्यानंतर या नराधमांनी दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस प्रयत्न करीत आहेत.