पैठण (औरंगाबाद) - कोरोना या साथरोगाचा फैलाव होऊ नये, म्हणून सरकार अनेक प्रकारची खबरदारी घेत आहे. लॉकडाऊनच्या काळात पैठण तालुक्यातील मुख्य रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. मात्र, नागरिक हे नाके चुकवून इतर मार्गांनी तालुक्यात प्रवेश करत आहेत. याची दखल घेत प्रशासनाने तालुक्यात येणाऱ्या सर्वच मार्गावर प्रवेश बंदी केली आहे.
बीड जालना, अहमदगर जिल्ह्यातील नागरिक, ऊसतोड मजूर, कामगार लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसून नाथसागराच्या उजवा व डावा कालवा रस्त्याचा वापर करून तालुक्यात प्रवेश करत आहेत. शिवाय त्यांच्याकडून कोणतीही आरोग्य तपासणी केली जात नसल्याचाही प्रकार समोर आला आहे. ही गंभीर बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
नागरिकांचा अशा प्रकारचा तालुक्यातील शिरकाव पाहता, प्रशासनाने पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, धरण शाखा अभियंता बुद्धभूषण दाभाडे, अण्णा शेंडगे, फिरोज शेख यांनी दोन्ही कालव्याची रस्ते पुढील आदेश मिळेपर्यंत रहदारीसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक गोरख भांबरे, बीट जामदार मदने हे यावेळी उपस्थित होते.