छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Agitation For Milk Price: सरकारकडून दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना २३ रुपये प्रति लिटर दूधाला भाव दिला जातो. मात्र हा दर खूप कमी असून तो किमान ४० रुपये इतका वाढवून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (agitation by pouring milk) सध्या राज्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून तिथे राज्यातील प्रश्नांवर नाही तर राजकीय वाद आहेत. नवाब मलिक यांच्याच विषयावर संपूर्ण अधिवेशन गाजत आहे. शेतकऱ्यांच्या विषयाकडे कुणाचंही लक्ष नाही. किमान त्या विषयापेक्षा आमच्या विषयावर चर्चा करा. दहा ते पंधरा हजार रुपये डिपॉझिट जमा केले जाते, ते तरी किमान आमच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेकवेळा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासन यांच्याकडे दर वाढीबाबत निवेदन दिले. तरी मागणी मान्य होत नसल्याने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवाढ दिली नाही तर रस्ता रोको, उपोषण करू. इतकंच नाही तर शहरात येणारे दूध बंद करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
शहरात मोठ्या प्रमाणात जाते दूध : जिल्ह्याच्या अतिशय जवळ असलेल्या आडगाव बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. रोज पाच ते सात हजार लीटर दूध वेगवेगळ्या दूध संघ, डेअरीला पुरवले जाते. त्यासाठी प्रती लिटर २३ ते २४ रुपये दर त्यांना दिला जातो. सर्वसामान्यांना दूध विक्री करताना पन्नास ते साठ रुपये दराने विक्री केले जाते. मग शेतकऱ्यांना इतका कमी मोबदला कसा दिला जातोय, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थितीत केला. तर दुधात होणारी भेसळ जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत दूधाचा दर वाढवून मिळणे शक्य नाही. भेसळयुक्त दूध बाजारात सर्रास जात असल्याने महिला आणि मुलांमधे व्यंग वाढत आहेत. हे माहिती असूनही सरकार आणि प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. हे सर्व थांबले तरच दुधाला दरवाढ मिळेल असे मत काही दुग्धव्यावसायिकांनी मांडले.
हेही वाचा: