औरंगाबाद शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गट श्रीकांत शिंदे यांच्या सभेवरून सुरू असलेल्या चर्चांना पोलीस अधीक्षकांनी पूर्णविराम लावत दोघांच्या सभेला परवानगी देणार असल्याचे सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांच्या पूर्वनियोजित सभास्थळी स्टेज लावण्यास अडचण असल्याने परवानगी नाकारली असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
सभेवरुन निर्माण झाला होता संभ्रम शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे समर्थक खा श्रीकांत शिंदे यांची सिल्लोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र दोघांनी सभा 7 नोहेंबर या एकाच दिवशी असल्याने आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली, तर श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र आदित्य ठाकरे यांची सभा गजबजलेल्या ठिकाणी महावीर चौक येथे होती. त्याठिकाणी गर्दी असते, शिवाय तिथे स्टेज लावण्यासाठी पर्याप्त जागा नसल्याने त्या ठिकाणची परवानगी नाकारली असली. तरी दुसऱ्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.
चोख पोलीस बंदोबस्त राज्यात उध्दव ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद पाहता, जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी पोलीस सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे.