औरंगाबाद - निवडणूक विभागाच्या स्थिर पथकाने मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका होंडा सिटी कारमधून १८ लाख १३ हजार रुपयांची रक्कम जप्त केली. ही रक्कम १० लाखापेक्षा अधिक असल्याने या घटनेचा पुढील तपास आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत.
निवडणूक काळात कुठलाही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये, मतदारांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवले जाऊ नये, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकातील निवडणूक विभागाच्या स्थिर पथकाकडून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जालना रोड वरील एपीआय कॉर्नर येथे वाहन तपासणी सुरू होती. यावेळी दिपक मुंदडा हे आपल्या होंडा सिटी कारमधून (एम एच २० इ वाय ८१२३) घरी जात होते. त्यांना पथकाने थांबवले. त्यांच्या गाडीची तपासणी केल्यानंतर त्यात १८ लाख १३ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. आज सकाळी ही रक्कम आयकर आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. ही रक्कम १० लाखापेक्षा अधिक असल्याने या रक्कमेबाबतची चौकशी आयकर विभागाकडून करण्यात येत आहे.