औरंगाबाद - तक्रारदाराच्या घराच्या भिंतीवर व पायऱ्यांवर लाल रंगाची निशाणी करून रस्त्याच्या कामाच्या नावाखाली बांधकाम पाडण्याची धमकी देऊन पैसे लुटण्याचा प्रकार घडला. औरंगाबाद महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अभियंता व जोडीदार अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
हेही वाचा - 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा हजार टक्के बरोबर निर्णय' मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा
वामन राघोबा कांबळे असे अभियंत्याचे नाव आहे तर विजय हरिषचंद्र निकाळजे असे अभियंताला साथ देणाऱ्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींनी 2 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची तक्रारदाराकडे मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने हुशारी दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथे लेखी तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाने 15 डिसेंबरला सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले व क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अरविंद चावरीया, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे यांनी केली.
हेही वाचा - अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी...