औरंगाबाद - वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाला वेगळाच आनंद असतो. मात्र सद्यस्थितीत कोरोनामुळे वाढदिवस साजरा करणे देखील अशक्य झाले आहे. मात्र, आनंद घ्यायचा तर तो कोणत्याही मार्गाने घेऊ शकतो याचे चांगले उदाहरण औरंगाबादच्या विश्वांजली मस्के या मुलीने घालून दिलंय. तिने तिच्या वाढदिवसाच्या पैशातून पोलिसांना सॅनिटायझर वाटप करत अनोखा वाढदिवस साजरा केलाय.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. त्यात आपलाही थोडा हातभार असावा, यासाठी विश्वांजली मस्के हिने आपल्या वडिलांना वाढदिवसासाठी होणारा खर्च यावर्षी होणार नाही. तर मास्क आणि सॅनिटायझर देऊ, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर वडिलांनी संमती देत मास्क, सॅनिटायझर आणून गरजू लोकांना तसेच पोलिसांना त्याचे वाटप केले. औरंगाबादच्या विश्वांजली मोहन मस्के हिचा 10 एप्रिलला 14 वा वाढदिवस होता. मात्र कोरोनामुळे वाढदिवसाच्या दिवशी कुठलाच आनंदोत्सव करायचा नाही, असे तिने ठरवले. रोज टीव्ही, वर्तमानपत्र सोशल मीडियावर कोरोनाच्या बातम्या पाहून चिमुकली व्यथित झाली होती.
वाढदिवसाला लागणाऱ्या पैशातून गरजूंना मदत करायची इच्छा तिने वडील मोहन मस्के यांना बोलून दाखवली. त्यांनी देखील संमती दिली. संपूर्ण देश लॉक डाऊन आहे. यात आपल्या सेवेसाठी आहोरात्र आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासन काम करत आहे. म्हणून आपण पोलीस प्रशासनाला मास्क आणि सॅनिटायझर वाटप करू, असे विश्वांजलीला वाटलं. तिने वडिलांना कल्पना दिली आणि आपल्या लाडक्या लेकीची इच्छा वडिलांनी पूर्ण केली. 500 सॅनिटायझर आणि 500 मास्क आणून जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलीस स्टेशन येथे आणि साफ सफाई कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. विश्वांजलीने लहान वयात दाखवलेली माणुसकी नक्कीच कौतुकास्पद आहे.