औरंगाबाद - डोळे बंद केले किंवा बांधले तर आपल्यासमोर अंधार होतो. आपल्याला काही दिसत नाही. मात्र शहरातील मैत्री याला अपवाद आहे. मैत्रीचे डोळे बांधलेले असले तरी ती सर्व पाहू शकते, मोबाईलवर आलेल्या कॉल्सचे नंबर असो वा नोटांवरील क्रमांक, ती अचूकपणे सांगते. एवढेच नाही, तर ती डोळे बंद असताना रंगदेखील अचूकपणे सांगू शकते. मैत्री थोरात असे या मुलीचे नाव आहे.
मैत्री दुसऱ्या वर्गात शिकणारी लहान मुलगी आहे. डोळे बंद असले तरी ती सर्व अनुभवू शकते, ओळखू शकते. एवढेच काय, पण ती पुस्तकेसुद्धा उत्तम रित्या वाचू शकते. तिची ही कला आई वडिलांनादेखील खरी वाटत नव्हती. त्यानंतर तिच्या आईने डॉक्टरांना बोलावून सर्व प्रकार दाखवला. मैत्रीने डोळे बांधून डॉक्टरांसमोर सर्व क्रिया केल्या त्यामुळे त्यांनादेखील हे मान्य करावे लागले. मैत्रीला याबाबत विचारले असता आपण मेडिटेशन मुळे हे करू शकतो, असा दावा तिने केला आहे.