औरंगाबाद - कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी औरंगाबादेतील आशा ट्रेडर्सने जवळपास ५ लाख रुपयांची औषधी कोल्हापूरला पाठवली आहे. तसेच पुण्यातील ३ डॉक्टरांच्या मदतीने तपासणी करून ही औषध देण्यात येणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने हाहाकार माजवला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरले. मात्र, पुरामुळे डायरिया सोबतच संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती आहे. दवाखाने आणि औषधीची दुकाने देखील पाण्याखाली गेल्याने आजारांना तोंड देण्यासाठी मुबलक औषधी देखील उपलब्ध नाही. त्यामुळे औरंगाबादच्या आशा ट्रेडर्सच्या निखिल मित्तल या औषधी विक्रेत्याने सर्दी, खोकला, गर्भवती महिलांसाठी, लहानमुलांसाठी आवश्यक असणारी पाच लाखांची औषध कोल्हापूरकरांच्या मदतीला पाठवली आहे.