औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. मंगळवारी सकाळी 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येने त्रिशतक पूर्ण केले असून रुग्णसंख्या थेट 321 वर पोहचली आहे.
औरंगाबादमध्ये आढळून आलेल्या रुग्णात जयभिमनगर - 21, अजबनगर - 1, संजयनगर - 1, बौद्ध नगर - 1 या भागातील रुग्णांचा समावेश आहे. शहरातील नवीन भागांमध्ये रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी दिवसभरात 15 रुग्ण आढळून आले होते. तर मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 9 दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या दिवसांमध्ये जवळपास 250 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर हजाराचा आकडा जर गाठला तर आश्चर्य वाटणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.