औरंगाबाद(पैठण) - एका 24 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे बुधवारी (3 फेब्रुवारी) दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. आयेशा शेख (वय २४), आलीया शेख (३ वर्ष), तंजीला शेख (चार महिने), अशी मृतांची नावे आहेत.
घरगुती वादातून आत्महत्या केल्याची शक्यता -
पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील आयेशा शेख यांचा विवाह पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथील इरफान शेख यांच्या बरोबर पाच वर्षांपूर्वी झाला होता. हे दोघेही कुटुंबातून विभक्त राहत होते. त्यांना तंजीला व आलिया अशी दोन अपत्ये होती. मंगळवारी रात्री इरफान व आयेशा शेख या दोघांमध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणाने बुधवारी आयेशाने घरात कुणी नसल्याचे पाहून रांजणगाव दांडगा शिवारातील विहिरीवर जाऊन आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
त्या विहिरीच्या बाजूला असलेल्या शेतातील काही महिला विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेल्या असता त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल व ओढणी आढळली. त्यांनी विहिरीत डोकावून बघितल्यानंतर चार महिन्याच्या तंजीलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्या महिलांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचून पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
मृतदेह पाठवले उत्तरीय तपासणीसाठी -
पाचोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ कणसे यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने 9 तासांच्या प्रयत्नांनंतर तिन्ही माय लेकरांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी त्यांना पाठवण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.