औरंगाबाद - नवीन वर्षाचे स्वागत करून औरंगाबादकडे भरधाव वेगात येणाऱ्या आलिशान गाडीचा अपघात झाला आहे. यात दोन तरुणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. रात्री दोन वाजेच्या सुमारास दौलताबाद किल्ल्याजवळ ही घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- 'लिव इन'मध्ये राहणाऱ्या तरूणीवर दिवसाढवळ्या जोडीदारानेच केला कोयत्याने हल्ला
सौरभ विजय नंदापूरकर (वय- 29 रा. रोकडे हनुमान कॉलोनी), वीरभास कस्तुरे (वय 34 रा. पुंडलिकनगर) असे मृत तरुणाचे नावे आहेत. तर नितीन रवींद्र शिशिकर, प्रतीक गिरीश कापडिया (वय30), मधुर प्रवीण जैस्वाल (वय30) अशी जखमींची नावे आहेत.
मंगळवारी या पाचही तरुणांनी दौलताबाद येथे निसर्गाच्या सानिध्यात थर्टी फस्ट साजरा करण्याचा बेत आखला होता. पाचही तरुण औषध विक्रीचा व्यवसाय करतात. दौलताबाद येथील एका हॉटेलमध्ये थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी ते गेले होते. 12 वाजता नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हे पाचही तरुण औरंगबादच्या दिशेने कारने येत होते. दरम्यान, दौलताबाद किल्ल्याजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या जुन्या बारवमध्ये (विहिरीत) पडली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक तासांच्या अथक परिश्रमा नंतर पहाटे विहिरीतील कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली होती. याप्ररणी पोलीस निरिक्षक राजश्री अधिक तपास करत आहेत.
अन्यथा इतर तिघेही वाचले नसते
औरंगाबादकडून थर्टी फस्ट साजरा करुन कन्नडकडे जाणाऱ्या तरुणांना या अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृत आणि जखमींना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. कन्नडच्या तरुणांना वेळीच अपघाताची माहिती मिळाल्याने जखमींना लवकर रुग्नालयात नेण्यात आले.
ते दगड काढले नसते तर दोघेही जिवंत असते
दौलताबाद पोलीस ठाणे होण्याअगोदर दौलताबाद हा भाग छावणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत होता. तत्कालीन छावणीचे पोलीस निरीक्षक शिवशंकर मुंढे यांनी याच विहिरीचे धोके लक्षात घेता रस्त्याच्या बाजूला स्वखर्चाने मोठं-मोठे दगड रचून एक भिंत तयार केली होती. त्या ठिकाणी विहीर असल्याची सूचना ही लिहिली होती. मात्र, मुंढे यांनी विहिरीभोवती बनविलेला तो कठडा आता अस्तित्वात नाही. जर तो कठडा असता तर अपघातातील दोघेही आज जिवंत असते. कारण मृत दोघांनी सीटबेल्ट लावले होते तरीही कारमधील एअर बॅग उघडली नाही. दगडी कठडा असता तर त्यास कार धडकल्यानंतर एअर बॅग उघडल्या असत्या आणि दोघांचेही प्राण वाचले असते.