औरंगाबाद - पोलिसांनी अवैधरित्या विक्री होणाऱ्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा परिसरातून तीन लाखांचा तर सिटीचौक पोलिसांनी पानदारीब भागातून १२ लाख ८७ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. दोन्ही कारवायांमध्ये तीन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुटखा, सुगंधित सुपारी विक्रीस मनाई असलेला विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद पोलिसांनी आपला मोर्चा गुटख्याच्या अवैध विक्रीकडे वळवला आहे. आठ दिवसात जवळपास चार विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात चार दिवसांपूर्वी गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर सिटीचौक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या कारवाईमुळे गुटख्याची अवैधविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार पोलिसांनी सातारा परिसरातील आलोकनगर भागातील एका घरावर छापा मारला असता त्यात तीन लाख ५६ हजारांचा अवैधरित्या साठवलेला गुटखा आढळून आला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुटखा जप्त करत एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई पार पडत असताना दुसरीकडे सिटीचौक पोलिसांनी पानदारीब भागातील एका गोदामावर छापा मारला. या कारवाईत पोलिसांना तब्बल १२ लाख ८७ हजारांचा गुटखा, सुगंधी सुपारी आणि देशात विक्रीस मनाई असलेल्या विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला. पोलिसांनी सर्व साठा जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतले. एकाच दिवशी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटख्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुटख्याचा हा सर्व साठा कुठून येतो याचा तपस पोलीस करत आहेत.