अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या युवा स्वाभिमान महोत्सवावर प्रशासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. सायन्स कोर मैदान येथे आयोजित आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सव आचारसंहितेचा भंग म्हणून प्रशासनाच्या वतीने बंद पडला असताना, सायन्स कोर मैदानात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कार्यकर्ते महोत्सव घेण्यावर ठाम : प्रशासनाच्या वतीने आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान महोत्सव अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद करण्यात आला असताना, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा महोत्सव आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका घेतली आहे. युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त माहिती दिली जाते, हा महोत्सव बंद पडणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोप युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय : दरवर्षीप्रमाणे आमदार रवी राणा 12 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान अमरावती शहरात युवा स्वाभिमान महोत्सव आयोजित करतात. अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीचा कोणीही उमेदवार नाही. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आमचा युवा स्वाभिमान महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष जितू दुधाने यांनी म्हटले आहे.
रवी राणा यांची संतप्त प्रतिक्रिया : महविकास आघाडी सरकारच्या काही नेत्यांनी, महोत्सव बंद पाडण्यासाठी जिल्हाधिकारीवर यांच्यावर दबाब आणला आणि बॅनर फाडले. माविआच्या काळात कधीही शेतकऱ्यांचे कार्यक्रम झाले नाहीत. उद्धव ठाकरे कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. बॅनरवर असलेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. आम्ही कोणतेही आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रमात शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
जि. प. सीईओ यांच्या आदेशात काय : जिल्हा परिषद सायन्सकोर मैदान अमरावती येथे दिनांक (१२ ते १६ जानेवारी २०२३)दरम्यान आयोजीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजीत करण्यास मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या पत्रान्वये सदर शेतकरी महोत्सव विधान परिषद निवडनूक संपल्यानंतर आयोजीत करण्यात यावा असे निर्देशीत दिलेले आहे.
आचारसंहितेचे उलन झाल्याचा ठेवला ठपका : जिल्हाधिकारी अमरावती यांचे आचार संहिता पथकाला सायन्सकोर मैदान अमरावती येथे दिनांक १२/०१/२०२३ रोजी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच ठिकाणी राजकीय पक्षाचे छायाचित्राचे बॅनर्स लागल्याचे उद्घाटन कार्यक्रम पार पडल्याचे व संबंधीत राजकीय पक्षाच नेत्यांनी संबोधन भाषण केल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचार संहितच्या अंमलबजावणीसाठी सायन्सकोर मैदान अमरावती भौतीक दृष्टया त्वरीत रिकामे करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद अमरावती या संस्थेची असल्याचे सदर आदेशान्वये सुचीत करण्यात आले आहे. दिलेली मैदान परवानगी रद्द करण्यात आली असून सदर मैदान खाली करण्याकरता आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा असा आशयाचे आदेश जि. प. सीईओ यांनी दिले आहेत.