अमरावती : माझ्या घरची वीज कापलीच कशी असा सवाल करत एका तरुणाने चक्क महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाच्या कार्यालयात शिरून कर्मचाऱ्यास मारहाण केली. ही घटना अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात असणाऱ्या वीज वितरण कार्यालयात घडली. राहुल राजू तिवारी असे वीज वितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्क शासकीय कार्यालयात सुरू असणारी फ्रीस्टाईल हाणामारी अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केली. मात्र सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने खळबळ उडाली.
काय आहे मारहाणीचे प्रकरण : औद्योगिक विकास महामंडळ वसाहत ( MIDC ) परिसरातील घनश्याम बारस्कर यांच्या फ्लॅट क्रमांक 303 मध्ये राहणाऱ्या तिवारी कुटुंबाने पाच महिन्यांपासून विजेचे देयक भरले नव्हते. यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालय येथे कार्यरत वरिष्ठ तज्ञ मंगेश काळे हे त्यांचे सहकारी वैभव सावळे यांच्यासह सोमवारी तिवारी यांच्याकडे गेले होते. यावेळी घरात असणाऱ्या एका महिलेने आमच्या घरी कोणी नाही, त्यामुळे आता वीज कापायची नाही असे त्यांना सांगितले. मात्र वरिष्ठांच्या आदेशामुळे मला वीज कापावी लागेल असे सांगून मंगेश काळे यांनी तिवारी यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित केला.
अगोदर मोबाईलवर धमकी अन् मग मारहाण : तिवारी यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित केल्यावर मंगेश काळे आपल्या कार्यालयात आले. यावेळी त्यांना राहुल राजू तिवारी या 21 वर्षीय तरुणाने तीन वेळा मोबाईल फोनवर कॉल केला. माझ्या घरचा वीज पुरवठा खंडित कसा केला याबाबत धमकावून विचारले. मात्र या कॉलला मंगेश काळे यांनी गांभीर्याने घेतले नाही. दरम्यान दुपारी राहुल तिवारी हा थेट महाराष्ट्र राज्य 20 मंडळ कार्यालयात आला आणि त्याने मंगेश काळे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या संपूर्ण प्रकारामुळे वीज मंडळ कार्यालयात खळबळ उडाली. या हाणामारीनंतर काही अधिकाऱ्यांनी राहुल तिवारी याला तुझा काय अडचणी होत्या हे वरिष्ठांकडे सांगायला हवे, अशी हाणामारी करणे योग्य नव्हते असे समजावून सांगितले. दरम्यान त्या संपूर्ण प्रकाराबाबत मंगेश काळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल : थेट शासकीय कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यास हाणामारी करणाऱ्या राहुल तिवारी या तरुणाविरोधात राजापेठ पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 353, 332, 452, 504, 323 आणि 56 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -